पुणे प्रभाग २२ मधील उमेदवारांतील वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत,भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला;apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला; प्रभाग २२ मधील उमेदवारांतील वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत,
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील दोन महिला उमेदवारांमध्ये रविवारी रात्री झालेल्या बैठकीदरम्यान जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आणि प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले.
प्रचार संपल्यानंतर झालेल्या बैठकीत एका महिला उमेदवाराच्या भावाने दुसऱ्या महिला नगरसेविकेवर “मागील निवडणुकीत दगा फटका केला, यावेळी तसे करू नका,” असा गंभीर आरोप केल्याचे समजते. क्रॉस व्होटिंग आणि पॅनलमधून एकमेकांविरोधात मतदान न करण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.
रात्री उशिरापर्यंत वाद मिटण्याची चिन्हे न दिसल्याने दोन्ही उमेदवार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. मात्र, निवडणुकीपूर्वी बदनामी टाळण्यासाठी तक्रार दाखल न करता प्रकरण वरिष्ठ नेत्यांकडे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने तात्पुरता तोडगा काढण्यात आला असून हा वाद वरिष्ठ पातळीवर मांडला जाणार आहे.
या वादानंतर पॅनलमधील इतर उमेदवारांनी संबंधित महिला उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. एकत्रित प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरील तिचे पोस्टरही काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
चार उमेदवारांच्या पॅनलमध्ये फूट पडल्याने पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणुकीच्या तोंडावर हा अंतर्गत कलह भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. प्रभाग २२ मधील हा वाद पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरतो की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
