पाऊण किलो सोने, एक क्सिंटल चांदी, ३ कार आणि पिस्तूल जप्त
१५ गुन्ह्यांमधील फरार सराईत गुन्हेगार गजाआड
पाऊण किलो सोने, एक क्सिंटल चांदी, ३ कार आणि पिस्तूल जप्त
पोना प्रमोद कदम यांची उत्तम कामगिरी
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडून वाकड पोलिसांचे कौतुक
दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या १५ गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी गजाआड केले. ही धडाकेबाज कारवाई पोलीस नाईक प्रमोद कमद यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकड पोलिसांनी केली. तपासादरम्यान या गुन्हेगारांकडून १ कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचे तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेले चोरटे सराईत गुन्हेगार असून, यांच्या अटकेमुळे ३५ हून अधिक गुन्ह्यांची उकल झाली आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वाकड पोलिसांचे कौतुक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी वाकड मार्गावरील येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाच्या दुकानातून ३ किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ६६०/२०२० ) भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी निगडीतील नावकर ज्वेलर्स मधून २० किलो चांदीचे दागिने आणि २६ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. लागोपाठ घडलेल्या या चोºयांमुळे एकच खळबळ उडाली. एकूणच या गुन्ह्यांचा आढावा घेता एकादी टोळी सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्यांचा तपास करणे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिसांची दोन पथके नेमण्यात आले. या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर करू लागले.
तपासादरम्यान, पोलिसांना निगडी येथील सराफ दुकानापासून काही अंतरावर एक इको कार संशयास्पद आढळली. त्यानुसार पोलिसांनी कारचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन इको कार चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा पिंपरी-चिंचवड शहराबाहेरच्या खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली परिसराकडे वळवली. तब्बल दहा दिवसांच्या अथक प्रयत्नाअंती वाकड पोलिसांच्या तपासी पथकाच्या हाती गुन्हेगाराची माहिती लागली. पोलीस नाईक प्रमोद कदम यांना मिळालेल्या माहितीच्या आधोर पोलिसांनी व्हेरना कारमधून फिरणारा आरोपी कल्याणी याला सापळा लावून साथीदारासह ताब्यात घेतले. या कारवाईत व्हेरना कार (एम एच 05 / ए एक्स 9376) जप्त करण्यात आली. कारची झडती घेतली असता त्यात दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूल आढळले. त्यांची कसून कसून चौकशी केली असता त्यांनी वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले.
कल्याणी हा सराईत आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या ४१ गंभीर गुन्ह्यात अटक होता. तसेच त्याच्यावर आणखी १५ गंभीर गुन्हे दाखल होते. त्या १५ गुन्ह्यात कल्याणी हा फरार होता. तो आपला अधिवास वारंवार बदलून राहत होता. तो नेहमी सशस्त्र वावरत असून त्याने यापूर्वी पोलिसांवर देखील गोळीबार केला आहे.
तसेच या आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत मिळून वाकड (५ गुन्हे), चिखली (५ गुन्हे), देहूरोड (३ गुन्हे), निगडी (६ गुन्हे), पिंपरी (३ गुन्हे), चिंचवड (२ गुन्हे), सांगवी (२ गुन्हे), भोसरी (२ गुन्हे), एमआयडीसी भोसरी (२ गुन्हे), हिंजवडी (१ गुन्हा), लोणी काळभोर (१ गुन्हा), लोणीकंद (१ गुन्हा), वालीव (१ गुन्हा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण ३४ गुन्हे केल्याचे सांगितले.
ही धडकोबाज कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ २ चे उपायुक्त सुधीर हिरेमठ, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर, तपासी पथकातील अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळे, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभिषण कन्हेरकर, श्याम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, बाबाजान इनामदार, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे आदी पथकाने केली.