पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या तयारीतील तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे-बेंगळुरू महामार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या तयारीतील तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक
Jan 19, 2021
पुणे : महामार्गावर प्रवाशांना लुबाडण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. कात्रज बोगद्याजवळ हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून 2 लाख 18 हजार व 1 पिस्तुल तसेच कोयते असा शस्त्र साठा जप्त केला आहे.
ओंकार उमेश सातपुते (वय 21), प्रीतम विठ्ठल ठोंबरे (वय 19) आणि साहिल आनंद मोरे (वय 18) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हद्दीत गस्त घातली जात आहे. तसेच सराईत गुन्हेगाराची माहिती काढली जात आहे. यादरम्यान कर्मचारी संतोष भापकर, सचिन पवार व राहुल तांबे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना कात्रज बोगद्याजवळ काहीजण शस्त्र घेऊन थांबले असून, ते वाहने अडवून लूटमार करण्याच्या तयारीत आहेत, असे समजले. त्यानुसार पोलिसांनी जांभूळवाडी या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडती पोलिसांना घातक शस्त्रे सापडली.
अटकेत असताना त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत आणखी एका साथीदाराचे नाव देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी साहिल मोरयाला वारजेमाळवाडी परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून आंबेगाव बुद्रुक केलेल्या घरफोडीतील 2 लाख 18 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगनाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, उपनिरीक्षक नितीन शिंदे व पथकातील रवींद्र भोसले, राजू वेगरे, श्रीधर पाटील तसेच गणेश शेंड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.