बिबवेवाडी पोलीसांची प्रशंसनीय कामगिरी; क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याचे सांगत तरूणाचे अपहरण करून 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना केले अटक

बिबवेवाडी पोलीसांची प्रशंसनीय कामगिरी; क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याचे सांगत तरूणाचे अपहरण करून 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना केले अटक
Apr 22, 2021
, फिरोज शेख
पुणे : कोरोना काळात रुग्णालये खूप पैसे कमवत असल्याच्या अंदाजाने बिबवेवाडी परीसरात पुणे-सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होममधील कर्मचारी तरुणाला क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याचे सांगत अपहरण करून बोपदेव घाटात नेहून बेदम मारहाण करत 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक करून दाखल गुन्हा उघडकीस आणत त्यांच्याजवळून गुन्ह्यामधील रोख रक्कम, ए.टी.एम.कार्ड, मोबाईल हँडसेट, 2 मोटार सायकल असे एकुण 1 लाख 4 हजार 600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
याघटने प्रकरणी मंदार मांडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत महिला सुप्रिया बाबुराव घाडगे (वय 30) हीच्यासह अमोल अनिल गायकवाड उर्फ सीडी सोन्या (रा. बिबवेवाडी), किरण प्रकाश साळुंखे (वय 27), मिथुन नंदलाल चव्हाण (वय 29, रा. माळशिरस ,जि. सोलापूर) असे बिबवेवाडी पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गुन्ह्यातील 2 फरार आरोपी साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरात बिबवेवाडी परीसरातील पुणे-सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होममध्ये अकाउंटंटचे काम करणारा मंदार मांडके (वय 24, रा.धायरी गाव, पुणे) याचे गेल्या महिन्यात शुक्रवार दि.5 मार्च रोजी दुपारी 12:00 वाजण्याच्या सुमारास एक महिला व तीच्या दोन साथीदारांनी “आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत, तु हॉस्पिटलमध्ये पैशाची अफरातफर करतोस, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. तुझ्यावर करावाई करुन तुला जेलमध्ये पाठवितो. तुझ्याकडे चौकशी करायची आहे.” असे सांगत त्याला बाहेर घेऊन गेले तर बाहेर आणखी आरोपींचे तीन साथीदार रिक्षात बसले होते. या सर्व आरोपींनी मिळून मंदार याला मारहाण करत जबरदस्तीने अपहरण करत रिक्षात बसवून बोपदेव घाटात नेहून बेदम मारहाण करून त्यांच्याकडे 30 लाखांची खंडणी मागणी केली. याप्रकरणी मंदार मांडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनील झावरे यांनी तपासी अधिकार्याना आरोपींना अटकाव करण्याकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावरील व तेथील भागातील सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी अमोल गायकवाड हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी अमोल गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी अमोल यांने त्याचे फरार आरोपी साथीदार हे अकलूज व सांगोला येथे असल्याचे माहिती दिली. त्याप्रमाणे बिबवेवाडी पोलीसांनी तिघांना शिताफीने पकडून त्यांच्याकडे तपासकामी सखोल चौकशी केली असता आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. सध्या कोरोना काळात रुग्णालयात रूग्णाची मोठी गर्दी होत असल्याने रुग्णालय खूप पैसे कमवत असल्याचा आरोपींचा गैरसमज झाला. त्यानंतर आरोपींनी राव नर्सिंग होमची पाहणी करत तेथील अकाऊंटंट याची विचारपूस करून त्याची संपुर्ण आर्थिक माहिती काढून आरोपींनी त्याचे अपहरण करत त्यांच्याकडे 30 लाखांची खंडणीची मागणी करून त्याच्या बँक खात्यातून एटीएम द्वारे 78 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत स्वतः जवळ एटीएम कार्ड ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी दाखल गुन्ह्यात आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून गुन्ह्यामधील रोख रक्कम, एटीएम कार्ड, मोबाईल हँडसेट, 2 मोटार सायकल असे एकुण 1 लाख 4 हजार 600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दाखल गुन्ह्यातील फरार 2 आरोपींचा शोध व गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, मा.श्री.नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,
मा.श्रीमती.नम्रता पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर,
मा.श्री.राजेंद्र गलांडे सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर,
मा.श्री.सुनिल झावरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन,
मा.श्रीमती.अनिता हिवरकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री.राजेश उसगांवकर यांच्यासह पोलीस अंमलदार शाम लोहोमकर, अमित पुजारी, तानाजी सागर, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अमोल शितोळे, राहुल कोठावळे, अतुल महांगडे यांनी केली आहे.