किरकोळ कारणावरून डोक्यात दगड घालून 45 वर्षीय व्यक्तीचा खून, कोंढव्यातील घटना

किरकोळ कारणावरून डोक्यात दगड घालून 45 वर्षीय व्यक्तीचा खून, कोंढव्यातील घटना
Jan 20, 2021
पुणे : दुचाकीला दगड मारल्याचा रागातून डोक्यात दगड घालून एका 45 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना कोंढव्यात घडली. पोलिसांनी या अज्ञात खुनाचा काही तासात छडा लावला अन पसार झालेल्या आरोपीला अटक केली. ज्ञानोबा गंगाधर धनगे (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी अतिष सुरेश वायदंडे (वय 23) याला अटक केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज भल्या सकाळी रक्ताच्या थारोळ्यात कोंढवा येथील पाण्याच्या टाकीजवळ मृतदेह आढळून आला होता.
ही माहिती मिळताच घटनास्थळी कोंढवा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह ओळखू येत नसल्याने प्रथम त्याची ओळख पटविण्यात आली. त्यावेळी त्याचे नाव ज्ञानोबा असल्याचे समजले. याचवेळी गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक आरोपींचा शोध घेत होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना अतिश वायदंडे यांनी हा खून केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
किरकोळ वादातून हा खून करण्यात आला असून, आरोपी व मयत हे एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होते. सोमवारी रात्री ही ते एकत्रच होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून मयत ज्ञानोबा धनगे याने अतिश वायदंडे याच्या दुचाकीला दगड मारला. याचाच राग आल्याने अतिश याने जवळ पडलेला मोठा दगड उचलून धनगे याच्या डोक्यात मारला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने धनगे यांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. परंतु पोलिसांनी पाच तासात त्याला अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस कर्मचारी मोराळे, काळभोर, जोगदंड, शिवले, दळवी, खंदारे, शेगर यांच्या पथकाने केली आहे.