दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोन्या विकारे टोळीचा कट उधळला गुन्हे शाखा १ च्या पोना सुशील जाधव यांची उत्तम कामगिरी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोन्या विकारे टोळीचा कट उधळला
गुन्हे शाखा १ च्या पोना सुशील जाधव यांची उत्तम कामगिरी

 दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोन्या ऊर्फ संकेत विकारे टोळीचा कट उधळण्यात आला. पोलीस नाईक सुशील जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही उत्तम कारवाई पुणे गुन्हे प्रकटीकरण शाखा १ च्या पथकाने केली. या कारवाईत टोळी प्रमुखासह तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून २ गावठी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतूस, धारदार कुकरी, मसाला पावडर, ३ मोबाईल असा एकूण ९० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रक चालकांना अडवून लुटण्याचे प्रमाण वाढले होते. सदर लुटारूंना अटक करण्यासाठी पुणे गुन्हे प्रकटीकरण शाखा १ चे पथक शोध घेऊ  लागले. शोधमोहीम सुरू असताना पोलीस नाईक सुशील जाधव यांना खबऱ्याने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मोन्या ऊर्फ संकेत विकारे टोळीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने जांभूळवाडी दरी पुलाजवळ सापळा लावून आरोपींवर धाड टाकली. त्यावेळी २ जणांनी तेथून पळ काढला. मात्र या टोळीचा प्रमुख मोन्या ऊर्फ संकेत विकारे (२६), अमर नंदकुमार चव्हाण(२८), अक्षय कांबळे (२४) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (१६९/२०२०) भादंवि कलम ३३९, ४०२, भारतीय हत्यार कायदा कलम ३, ४, २५ सह महाराष्ट्र कायदा कलम ३७(१), १३५ नुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला मोन्या ऊर्फ संकेत विकारे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जबर दुखापत, अग्निशस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपांचे १८ गुन्हे दाखल आहेत. कोरोना संकट काळात मोन्या हा पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. त्यानंतर त्याने आणखी ४ गुन्हे केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे तर अमर चव्हाण याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा अशा प्रकारे ४ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अक्षय कांबळे याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा दाखल असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
सदर कारवाई पुणे पोलीस दलाचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक मोराळे, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखा १ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अंमलदार सचिन जाधव, संजय बरकडे, इम्रान शेख, इरफान मोमिन, अमोल पवार, अजय थोरात, बाबा चव्हाण, योगेश जगताप, सुधीर माने, प्रशांत गायकवाड, तुषार माळवदकर, अशोक माने, बामगुडे आदी पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *