मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेची धडाकेबाज कारवाई मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानात टाकली धाड २.७५ लाखांचे मुदत संपलेले खाद्यपदार्थ जप्त
मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेची धडाकेबाज कारवाई
मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानात टाकली धाड
२.७५ लाखांचे मुदत संपलेले खाद्यपदार्थ जप्त
मुदत संपूण एक-दीड वर्षाचा कालावधी उलटला असतानाही सिलबंद खाद्यपादर्थांचे पॅकेट विकणाऱ्या दुकानात धाड टाकण्यात आली. सदर खाद्यपदार्थ विकून नागरिकांच्या व लहान मुलांच्या जिवाशी सुरू असलेल्या खेळाचा पर्दाफाश मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हा नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केला. या कारवाईत तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचे मुदत संपलेले विविध कंपन्यांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलाचे आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेचे पथक कायम सतर्क असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या पथकाने लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाचा पर्दाफाश केला. मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री होत असल्याची माहिती सदर पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अंधेरी पश्चिम परिसरातील लगंडाबाबा चाळ येथील दुकान क्र. १ मध्ये धाड टाकली. त्यावेळी मुदत संपलेले अनेक चॉकलेट, बिस्कीट, फ्रुटी ज्यूस व अन्य खाद्यपदार्थ आढळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी लिटिल बार (बिस्कटी) ८४० पॅकेट, क्रिम अॅण्ड क्रिस्प (चॉकलेट वेफर बार) २४० पॅकेट, कॅविन्स १ हजार १७० पॅकेट, पेरी पेरी (स्पायसी मिक्स मसाला) ६२४ पॅकेट, होल ग्रीन ओलिवेसच्या ३० बॉटल, अमूल प्रीमिअम बटर मिल्क ९० पॅकेट, पेपर बोट (ज्यूस) १४३ बॉटल आदी खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या खाद्यपदार्थांची किंमत २ लाख ७५ हजार ९३५ रुपये आहे. पुढील कारवाईसाइी दुकान चालक मुस्तकी शेख युसिफ याला सदर खाद्यपदार्थांसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कारवाई आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेचे सह पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आर्थिक गुन्हे नियंत्रण विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी, आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम वंदाते, हवालदार महेंद्र जाधव, पोलीस नाईक गणेश डोईफोडे, पोलीस नाईक महेंद्र दरेकर, पोलीस नाईक संतोष पवार, पोलीस नाईक अमित वलेकर, पोलीस अंमलदार विशाल यादव, पोलीस अंमलदार महेश कोळी, पोलीस अंमलदार (चालक) दिनेश आंगवळकर आदी पोलीस पथकाने केली.